देशात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मविआ लोकसभेची निवडणूक लढतेय याच आनंद आहे

18 Mar 2024 17:35:45
 
data
 
updated text 
 
मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. पण महाविकास आघाडीचा अद्यापपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही नेते अधिकृत घोषणा होण्याआधी काही जागांवर दावा करत आहेत. त्यातून महाविकास आघाडीमधील विसंवादच अधिक दिसून येऊ लागला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरु असल्याच पहायला मिळतय. ‘उगाच हट्ट करु नका, आमचा निर्णय झालाय’ असा स्पष्ट शब्दात काँग्रेस नेत्याने ठाकरे गटाला या जागेवरील दावा मागे घ्यायला सांगितला आहे. ठाकरे गट सांगलीच्या लोकसभा जागेवर दावा करत आहे. त्याला विश्वजीत कदम यांनी उत्तर दिलं आहे. “देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा, सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल असं दूरदृष्टी, कौतुकास्पद नेतृत्व सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला काँग्रेसच्या विचारातून दिलेलं आहे. म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहिला पाहिजे” असं विश्वजीत कदम म्हणाले.
“मविआ एकत्र आली. देशात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी मविआ लोकसभेची निवडणूक लढतेय याच आनंद आहे. सांगलीच्या जागेवर मविआमधील घटक पक्षाने अधिकार सांगण्याच कारण नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच रहाणार आहे. अशी विनंती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. ही जागा काँग्रेसकडे राहणार यावर ठाम आहोत” असं विश्वजीत कदम म्हणाले. “चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत. पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. पण राजकारण, समाजकारण करताना विचारधारेच पाठबळ लागत. सांगलीत दृष्काळाचा प्रश्न आहे. प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्याने ठेवावी लागते. चंद्रहार पाटील यांनी सहा ते सात दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे” असं विश्वजीत कदम म्हणाले.
Powered By Sangraha 9.0