जगभरात पुन्हा एकदा भारताचा डंका वाजत आहे. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. भारताने जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनून इतिहास रचला आहे. नीति आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली.
नीति आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या दहाव्या बैठकीनंतर ते म्हणाले, “जागतिक आणि आर्थिक वातावरण देशासाठी अनुकूल आहे. आता आपण जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहोत. आता आपण चार ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत.”
सुब्रमण्यम यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की, “आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. आपण हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. आपण आपल्या योजनेवर ठाम राहिलो, तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे जगात अस्वस्थता असताना भारताने जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याची कामगिरी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्कही भारताच्या विकासाला रोखू शकले नाही आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाचाही आर्थिक विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. भारत बर्याच काळापासून जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आता त्याने जपानला मागे टाकले आहे.